आज जागतिक आदिवासी दिवस आहे. जगात सगळीकडे ०९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील आदिवासी समाजाने जास्तीत जास्त पर्यावण राखले आहे. आदिवासी समाज हा बाहेरील जगाशी संपर्कात नव्हता. त्यामुळे आदिम जमाती या शिक्षण, आरोग्य, रोजगार, यांपासून वंचित राहिल्या. या मूळ निवासी आदिवासी जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने ( United Nations Organisation ) ०९ ऑगस्ट १९९४ हा दिवस जागतिक आदिवासी दिवस ( International Day of Indigenous People ) म्हणून घोषित केला. तेव्हापासून आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष देणे, त्यांना मूलभूत सेवा मिळवून देण्यास प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली.
आदिवासींबद्दल थोडक्यात माहिती
एका सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आदिवासी म्हणजे पूर्वी पासून वास्तव्य करत असलेले. आदिवासी समाजाची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असते. जंगल, डोंगरदऱ्या अशा भागात राहणे, बाहेरच्या जगाशी संपर्क नसणे, अशी आदिवासी समाजाची ओळख असते. निसर्ग हे आदिवासींचे घर आहे. आदिवासी पूर्वीपासून लढा देत आला आहे. मग तो लढा आपले घर म्हणजे निसर्ग वाचवण्यासाठी असो व आपल्या देशासाठी असो. त्याने वेळोवेळी आपली भूमिका बजावली आहे.
आदिवासींची संस्कृती हि वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती आहे. आदिवासींनी निसर्गाला आपला देव मानले आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाची आदिवासी पूजा करतो. कारण आदिवासींचे संपूर्ण जीवन निसर्गावर अवलंबून आहे. आदिवासींचेच नाही तर पूर्ण मानव जातीचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त जंगल हे आदिवासींनीच राखले आहे. आदिवासी जमातीत हिरवा देव, वाघ देव, कनसरी, इंदल देव, नारन देव, शिवाऱ्या देव, चव्हाटा देव, रवाल देव, डोंगऱ्या देव, असे अनेक देवांची पूजा केली जाते. वेगवेगळे सन साजरे केले जातात. या वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे नृत्य देखील केले जाते. जसे कि, तारपा नृत्य, कर्मा नृत्य, ढेमसा नृत्य, ढोल नाच, लांगी नृत्य, सैला नृत्य, बिहू नृत्य, इ. नृत्य केले जातात. आदिवासी समाजात भाषा हि वेगवेगळी बोलली जाते. आदिवासींच्या बोलीभाषेला लिपी नाही. आदिवासी समाज आता मागे राहिला नाही आहे. जगभर त्याने आपल्या कलेचा ठसा उमटवलेला आहे. मग ते नृत्यकला असो, शिल्पकला असो किंवा चित्रकला असो ( जसे वारली चित्रकला, पिठोरा चित्रकला ).
👉 आदिवासींनी दिलेला लढा -
लढा देण्यातही आदिवासी मागे राहिलेले नाही. सर्वात आधी लढा हा आदिवासींनीच दिलेला आहे. आदिवासींनी निसर्ग वाचवण्यासाठी खूप लढे दिले आहेत, देशासाठी लढे दिले आहेत. देशासाठी आदिवासींनी आपले प्राणही दिले आहेत. आदिवासी समाजातही क्रांतिकारक होऊन गेले. एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, नाग्या कातकरी, असे अजून शेकडो क्रांतिकारकांनी लढा दिला आहे. शेकडो क्रांतिवीरांची अजून नावेही आपल्यांना माहिती नाहीत.
👉 आदिवासींसाठी संविधानात असलेल्या तरतुदी -
संविधानात आदिवासी समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केला जातो. महाराष्ट्रात अनुसूचित जमातींची संख्या ०१ कोटी ०५ लाख इतकी ( २०११ च्या जनगणनेनुसार ) लोकसंख्या आहे. अनुसूचित जमाती या मगासलेल्या असल्याने त्यांच्या विकासासाठी, त्यांना मूलभूत सोयी, सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु हे आरक्षण जेव्हा संविधान १९५० पासून लागू केले तेव्हापासून पुढच्या १० वर्षांसाठी असेल अशी तरतूद केली. आणि मग वेळोवेळी आदिवासींच्या विकासासाठी हे आरक्षण दर १० वर्षांनी वाढवण्यात आले. आणि आता सध्या हे आरक्षण २०३० पर्यंत वाढवले आहे. आदिवासींसाठी संविधानात जे आरक्षण आहे ते कायमस्वरूपी नाहीये.
👉 संस्कृतीचे जतन केले पाहिजे -
आपण आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपल्या संस्कृतीचे जतन आपणच करू शकतो. ते आपल्याच हातात आहे. आदिवासींनी आपले सण साजरे केले पाहिजेत. प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरा टिकवली पाहिजेत. हे काम समाजातील मोठ्या माणसांनी केले पाहिजे. त्यांनी गावातील पोरांबरोबर आपल्या संस्कृतीबद्दल चर्चा केली पाहिजे. प्रत्येकांनी आपल्या घरात आपल्या संस्कृतीबद्दल चर्चा केली पाहिजे. मुलांशी अधून-मधून संवाद साधला पाहिजे. त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल मुलांना सांगितले पाहिजे. आपल्या हातात मोबाईल आहे. त्याचा वापर करा. एकमेकांना आदिवासी संस्कृतीबद्दल सांगा. सर्व आदिवासी समाजात आपल्या संस्कृतीचा प्रसार करा. इंटरनेट, whats app द्वारे, इतर समाजमाध्यमांद्वारे आपल्या संस्कृतीबद्दल माहिती द्या ती share करा. पोरांनी आपल्या संस्कृतीबद्दल माहिती नसेल तर आपल्या आई-वडिलांना विचारा. गावातील मोठ्या जाणकार व्यक्तींकडून माहिती घ्या, आणि ती इतरांनाही सांगा.
👉 महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 भारतातील आदिवासी जमातींची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
धन्यवाद!
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/knowledgebook1999


